ब्रम्हीभूत परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ

आदिनाथ शंकरापासून जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराजापर्यंत व पुढे स्वामी स्वरूपानान्दापर्यंत चालत आलेल्या नाथ संप्रदायातील स्वामी माधवनाथ हे अधिकारी सत्पुरुष होते. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१७ रोजी कोकणातील कोकबन या गावी झाला. त्यांच्या घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांचा पिंड मुळात शुद्ध सत्वगुणी होता. बालवयात गीता पठणाचे व नियमित व्यायामाचे बाळकडू त्यांना मिळाले. तरुण वयात पितृछत्र गेल्याने शिक्षण सोडून ते पुण्याला आले. चरितार्थासाठी त्यांनी शिवणकाम व पुढे कापड व्यवसाय पत्करला. आई, बहिण , पत्नी, मुले अशा प्रपंचाची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांची नाम, ध्यान, शास्त्रग्रंथांचा अध्ययन अशी पारमार्थिक साधना चालू होती.

१९५८ साली अंतःस्फूर्तीने स्वतःच्या घरी त्यांनी ज्ञानेश्वरीच्या स्वान्तः सुखाय निरुपणाला सुरुवात केली. १९६८ साली पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचा कृपानुग्रह त्यांना लाभला. त्यांची स्वानुभावाधिष्ठित रसाळ प्रवचने रंगू लागली, श्रोत्यांची संख्या वाढू लागली.

सन १९७३ साली स्वामी स्वरूपानंद यांनी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार स्वामी माधवनाथ यांच्या हाती सुपूर्त केले. १५ डिसेंबर १९७४ रोजी स्वामी स्वरूपानंद यांनी देह ठेवल्यानंतर स्वामी माधवनाथ यांचे सद्गुरुकार्य सुरु झाले. ‘बुडते हे जन न देखवे डोळा’ अश्या कळवळ्याने, ज्ञानेश्वरी, दासबोध, ब्रह्मसूत्रे, योगसूत्रे यावर प्रवचने, सत्संग (शंकानिवारण) या माध्यमातून अनेकांना त्यांनी पारमार्थिक मार्गदर्शन केले. त्यांच्या तर्काधीष्ठित निरुपणामुळे समाजातील सुशिक्षित व तरुण वर्ग त्यांच्याकडे ओढला गेला. शेकडोंना त्यांचा अनुग्रह लाभून सोS हं ध्यानाची अंतरंग साधना करण्याची प्रेरणा मिळाली.

स्वतः साधना करून शुद्ध परमार्थाच्या प्रचार व प्रसाराच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या युवा साधकांना त्यांनी जवळ केले. प्रपंच करून परमार्थ करता येतो किंबहुना प्रपंचच परमार्थरूप करता येणे शक्य आहे अशी शिकवण त्यांनी दिली. परमार्थ मार्गाचे अनुसरण करून उत्तम सद्गुण संपन्न व्यक्ती घडली तरच समाजाचे खऱ्या अर्थाने उत्थान होईल अशी स्वामीजींची धारणा होती. ३० जुलै १९९६ रोजी गुरुपोर्णिमेच्या पावन दिवशी ते सदगुरु चरणी लीन झाले. स्वामी माधवनाथांचे कार्य त्यांचे उत्तराधिकारी स्वामी मकरंदनाथ समर्थपणे पुढे चालवीत आहेत.